केज (बीड) — केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून घेतले जात असून, त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.विलास घुले यांच्या पत्नी, भाऊ रमेश घुले आणि उमेश माने यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी तसेच हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सौरभ सोनवणेच्या भूमिकेची चौकशीची मागणी पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी घेतलेल्या पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. तसेच एसआयटी पथकाने सौरभ सोनवणे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नसल्याने घुले कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.सौरभ सोनवणे यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली आणि कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप घुले कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. मात्र या आरोपांबाबत तपास यंत्रणेकडून अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. २० जून रोजी झाला होता विलास घुले यांचा मृत्यू २० जून रोजी केज तालुक्यातील टाकळी येथे विलास घुले यांच्यावर एका टोळक्याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करत ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी केज पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले होते.या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत आंदोलकांशी संवाद साधला होता. आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आणि काही आरोपींना अटक झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. एसपींनी आंदोलनस्थळी यावे, अशी मागणी दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी येऊन मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.यासोबतच रमेश घुले यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित बदनामीकारक माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि एका महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. Post navigation बापरे ! जालना एसीबीने बीडमध्ये एकाचवेळी तीन लाचखोरांना पकडले स्वाक्षरीसाठी पाच हजारांची लाच ; बीड एसीबी कारवाई