बीड (प्रतिनिधी ) दि. १० : दोन दिवसापूर्वीच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास ट्रॅपचा झटका दिल्यानंतर आज पुन्हा एक कारवाई बीडमध्ये करण्यात आली. जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कामासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना समाजकल्याण विभागातील अधिलेखापाल राठोड अण्णासाहेब गबरू याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि.१०) रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भातील काम करून देण्यासाठी आरोपीने ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. त्यानुसार आरोपी राठोड अण्णासाहेब गबरू याला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने केली. Post navigation ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी फडणवीसांचे मोठे आदेश – घाटनांदूरमध्ये २१ वर्षीय युवकाचा चाकूने वार करून खून