BBL : 52 चेंडूत ठोकले शतक! T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने थोपटले दंड

Australias T20 Captain Mitchell Marsh Scored A Century In The Bbl

 नवीन वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा टी२० कर्णधार मिचेल मार्शने बिग बॅश लीग २०२५-२६ च्या १९ व्या सामन्यात होबार्ट हरिकेन्सविरुद्ध शानदार शतक ठोकून आपले इरादे स्पष्ट केले आहे.  १ जानेवारी २०२६ रोजी होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून २२९ धावा उभ्या केल्या. टी२० विश्वचषक २०२६ साठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच मिचेल मार्शने आपला जळवा दाखवला आहे. टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत मिचेल मार्श कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकण्याची जबाबदारी घेणार आहे.

मिचेल मार्शने वादळी  शतक

होबार्ट हरिकेन्सकडून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, मिचेल मार्शने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. मार्शने फक्त ५८ चेंडूंचा सामना करत १०२ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याने खेळीत ११ चौकार आणि ५ षटकार मारले आहेत. त्याने १७५.८६ च्या स्ट्राईक रेटने या धावा फटकावल्या. त्याने फक्त ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे त्याच्या बीबीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले आहे. तथापि, १९ व्या षटकात त्याला नॅथन एलिसने झेलबाद केले.

मार्शची ही कामगिरी देखील विशेष ठरली आहे. कारण आदल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २०२६ च्या टी२० विश्वचषकसाठी आपला तात्पुरता संघ घोषित  केला. मिचेल मार्शकडे ऑस्ट्रेलिया संघाची धुरा सोपवली आहे. संघ घोषणेनंतर काही तासांतच मैदानात उतरत मार्शने फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. त्याच्या या खेळीने टी२० विश्वचषकातील आशा उंचावल्या आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठीही मार्श ची खेळी महत्वाची मानली जात आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत टी२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

आरोन हार्डीला शतकाची हुलकावणी

मिचेल मार्श व्यतिरिक्त, आरोन हार्डीने देखील पर्थ स्कॉर्चर्ससाठी एक शानदार खेळी साकारली. परंतु त्याला शतक पूर्ण करता आले नाही.  हार्डी ४३ चेंडूत ९४ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीत ९  चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता, ज्यामुळे पर्थ स्कॉर्चर्सना मोठी धावसंख्या उभी करता आली.