केनीसह पाच ट्रॅक्टर असा तीस लाखांचा मुद्देमाल जप्त
ट्रॅक्टर चालक-मालक यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गेवराई, प्रतिनिधी : राक्षसभूवन गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत केनीसह ५ ट्रॅक्टरअसा एकूण ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (गुरूवार दि.२८) सकाळी दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन गोदापात्रात मोठी कारवाई केली असून, मागील काही महिन्यांपासून राक्षसभूवन, आपेगाव अशा तालुक्यातील अनेक गोदापात्रात वाळू माफियांनी रात्र दिवस राजरोसपणे अवैध वाळूची चोरटी वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवत आहे. व अव्वाच्या सव्वा भावाने विकत आहेत. तसेच राक्षसभूवन गोदापात्रात अनाधिकृत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पथक राक्षसभूवन गोदापात्रात वेषांतर होऊन, तिथे केनीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून छापा टाकला असता, ५ ट्रॅक्टर व केनी मिळुन आले आहे. या कारवाईत ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात ०५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई समजली जात असून, या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही स्थानिक गुन्हे शाखेकडून अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, सफौ/संजय जायभाये, पोह/ महेश जोगदंड, विकास राठोड, पोना/ विकास वाघमारे, बाळू सानप, पोशि/ बाप्पासाहेब घोडके, नामदेव उगले यांनी केली आहे.