जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग भारतात खेळली जाते, ती म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. या लीगमध्ये खेळण्याचे जगभरातील क्रिकेटपटूंचे स्वप्न आहे. ही सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग देखील आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय निवृत्त खेळाडूंसाठी लीग सुरू करणार असल्याची बातमी अलीकडेच आली होती. ज्यामध्ये अनेक जुने दिग्गज खेळाडू सहभागी होताना दिसतील. अलीकडे अशा अनेक लीग पाहिल्या आहेत, परंतु बीसीसीआय अशा लीगचे आयोजन करणार की नाही यावर बीसीसीआय सचिव जय शाह यांचे मोठे विधान समोर आले आहे.
अलीकडेच, एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, जगभरातील विविध T20 लीगमध्ये खेळलेल्या काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनी जय शाह यांची भेट घेतली आणि देशातील निवृत्त क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी स्पर्धा आयोजित करण्याची विनंती केली. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी अशा प्रकारची टी-20 लीग आयोजित करण्याच्या कोणत्याही अफवा फेटाळून लावल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जय शाह म्हणाले, ही फेक न्यूज आहे. या संदर्भात कोणत्याही प्रस्तावावर चर्चा झालेली नाही. याबद्दल मला कोणीही सांगितले नाही. मात्र, असा प्रस्ताव आल्यास मी त्याबाबत काय करेन हे मला माहीत नाही.
अलीकडे निवृत्त खेळाडू अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतात. मात्र, या सर्व क्रिकेट लीगचे आयोजन कोणत्याही क्रिकेट मंडळाने केलेले नाही. ज्यामध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज, लिजेंड्स लीग क्रिकेट आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स यांचा समावेश आहे. इरफान पठाण, सुरेश रैना, युसूफ पठाण, ख्रिस गेल, हरभजन सिंग, युवराज सिंग यांसारखे खेळाडू या लीगमध्ये सहभागी झाले होते. अलीकडेच, इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स खेळली गेली, ज्यामध्ये विविध देशांचे संघ खेळण्यासाठी आले होते, जिथे भारत चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून स्पर्धा जिंकली.
याआधी, भारतात लीजेंड्स क्रिकेट लीग खेळली गेली होती, ज्यामध्ये आयपीएल सारख्या वेगवेगळ्या संघांनी भाग घेतला होता आणि भारतातील अनेक शहरांमध्ये सामने खेळले गेले होते. ही क्रिकेट लीग चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होती आणि सामन्यांदरम्यान मैदानातही बरीच फटकेबाजी पाहायला मिळाली. पण बीसीसीआय सध्या अशी कोणतीही क्रिकेट लीग आयोजित करण्याच्या मनस्थितीत नाही.