तीन चोरट्यांना गावकऱ्यांकडून बेदम मारहाण!
केज : केज तालुक्यातील कानडीमाळी गावावरून गुरुवारी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान ड्रोन उडत असल्याने गावकरी जागे झाले. याच वेळी गावात आलेल्या एका जीपमधील संशयितांची चौकशी असता त्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चोरटे गावकऱ्यांच्या हाती लागले. गावकऱ्यांनी तीन संशयित चोरटय़ांना बेदम मारहाण करून पोलीसांच्या स्वाधीन केले. तर यावेळी एकजण फरार होण्यात यशस्वी झाला.
कानडी माळी गावात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरुन लागल्यामुळे गावकरी घाबरून जागे राहुन गस्त घालीत होते. यावेळी एक जीप ( एमएच 45 एन 3451) कानडीच्या बस स्टँडवर आली. गावकऱ्यांनी गाडीला वेढा घालून विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. गावकऱ्यांनी गाडीची झडती घेतली असता त्यात हत्यारे आढळून आले. गाडीत दरोडेखोर असल्याचा उलगडा होताच गावकऱ्यांनी आतील तिघांना ताब्यात घेत बेदम चोप देत बांधून ठेवले. तर अंधाराचा फायदा घेत एक चोरटा फरार झाला.
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांन देताच. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, राजू वाघमारे, चंद्रकांत काळकुटे, नितीन जाधव, होमगार्ड बाळू थोरात, विजय वनवे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. राहुल विकास काळे ( 18 रा सरमकुंडी) , श्रावण महादेव काळे ( 20 रा केवड), अमोल सटवा घुले ( 21 ) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.