भारतीय सेनेच्या उपक्रमात सहभाग
किल्लेधारूर प्रतिनिधी : घागरवाडा येथे भारतीय सेनेच्या १३६ इको बटालियनकडून ११५ हेक्टर वन क्षेत्रात होत असलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेत कायाकल्प फाऊंडेशनच्या सदस्यांनी दि.२५ रविवार रोजी सहभाग नोंदवून डोंगरावर वृक्षारोपण केले. भारतीय सेनेच्या १३६ इको बटालियनच्या बी कंपनीकडून धारुर तालुक्यात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. भारतीय सेनेकडून धारुर वनपरिक्षेत्रातील घागरवाडा परिसरातील ११५ हेक्टर डोंगरी भागात सध्या वृक्षारोपण करण्यात येत आहे. याशिवाय शहरातील महाविद्यालये, वस्तिगृह, ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. बीड जिल्ह्यात वन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने शासनाकडून ही मोहिम भारतीय सेनेच्या १३६ इको बटालियनच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षण हितार्थ शहरात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरणवादी कायाकल्प फाऊंडेशनच्या सदस्यांनी दि.२५ अॉगस्ट रविवार रोजी सहभाग घेतला. प्रत्यक्ष घागरवाडा येथील नियोजित साईटवर जावून वृक्षारोपण केले. यावेळी सुभेदार मोरे व बी कंपनीच्या सैनिकांनी सहकार्य केले. या वृक्षारोपणासाठी ज्येष्ठ वैद्यकीय व्यवसायिक व शेतीतज्ञ डॉ. बी.के. ठोंबरे, ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, पत्रकार सय्यद शाकेर, प्राचार्य विजयकुमार शिनगारे, विश्वानंद तोष्णीवाल, दिपक गुळवे, अलंकार कामाजी, बालाजी सातभाई, संदिप शिनगारे, बिभीषण सोनार, प्रशांत सुपेकर, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन चिद्रवार, राजन ठोंबरे यांनी सहभाग घेतला. भारतीय सेनेच्या शहरातील छावणीत इको बटालियनचे कंपनी कमांडर कर्नल अमित प्रभू, सुभेदार मोरे, हवालदार शेख जलील यांनी कायाकल्प सदस्यांचे स्वागत केले.