×
Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

गेवराई तालुक्यातील ‘ड्रोन’ च्या घिरट्यांचा पोलीसांकडून उलगडा

लष्करासाठी ड्रोन बनविणार्‍या कंपनीकडून सुरु होत्या चाचण्या

संबंधित ठिकाणी प्रतिनिधी पाठवून याबाबत अजून खात्री करण्यात येईल – पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर

गेवराई, प्रतिनिधी : गेवराई शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये तसेच वाड्या, वस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या अंधारात तीन चार वेळा ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे ड्रोन कोण उडवत आहे? कशासाठी उडवत आहे? त्या मागचा हेतू काय आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेर या प्रश्नांना पूर्ण विराम मिळाला असून या ड्रोनचा पोलीसांनी उलगडा केला आहे. लष्करासाठी ड्रोन बनविणार्‍या कंपनीकडून या चाचण्या सुरु असल्याची माहिती गेवराई पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी दिली आहे.

गेवराई तालुक्यात मागील काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. सुरुवातीला ग्रामीण भागात घिरट्या घालणारे ड्रोन चार पाच दिवसांपासून गेवराई शहरात देखील घिरट्या घालताना दिसू लागले. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून सातत्याने घडत आहे. चकलांबा, तलवाडा तसेच गेवराई पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना घडल्या आहेत. तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असे काही स्थानिक ग्रामस्थांच म्हणणं आहे. रात्रीच्या वेळीच हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेक गावात आता रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्यास सुरुवात केली. चोरी करण्याच्या दृष्टीने रेकी करण्यासाठी ड्रोन उडवले जात असल्याची चर्चा होती. मात्र, रात्रीच्यावेळी आकाशात घिरट्या घालणार्‍या या ड्रोनचा उलगडा गेवराई पोलीसांनी केला आहे. लष्करासाठी ड्रोन बनविणार्‍या कंपनीकडून याच्या चाचण्या सुरु असल्याची माहिती ठाणेप्रमुख प्रविणकुमार बांगर यांनी दिली.

नागरिकांनी घाबरु नये- प्रविणकुमार बांगर

गेवराई तालुक्यातील अनेक भागात आकाशात ड्रोन दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र नागरिकांनी घाबरु नये. चोरीच्या अथवा किंवा रेकी करण्यासाठी हे ड्रोन उडवले जात नसून लष्करासाठी ड्रोन बनविणार्‍या कंपनीकडून या चाचण्या घेतल्या जात आहेत, तसेच उद्या त्या ठिकाणी एक प्रतिनिधी पाठवून याबाबत सविस्तर‌ व‌ अधिक माहिती घेऊ, आणि खात्री करू, अशी माहिती गेवराई पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी दिली आहे.