Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची अखेर बदली; लोकसभा निवडणुकीत ठरल्या होत्या वादग्रस्त

बीडच्या जिल्हाधिकारी पदी अविनाश पाठक यांची नियुक्ती 

 बीड : राज्यातील लक्षवेधी आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतींमध्ये बीड लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे विरुद्ध महायुतीच्या पंकजा मुंडे यांच्यात हा सामना रंगला होता. या निवडणुकीत बीड मतदारसंघात जातीय तेढ पाहायला मिळाले. ही निवडणूक मतदान केंद्रावरील बोगस मतदान आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाच्या आरोपामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. यानंतर आता महिनाभरातच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक दरम्यान बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अनेक आरोप केले होते. त्यामुळे, त्या चांगल्याच वादग्रस्त ठरल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून थेट तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांना मतमोजणीवेळी सहभागी न होऊ देण्याचीही मागणी केली होती. त्यामुळे, बीडच्या लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे वादग्रस्त ठरल्या होत्या. अखेर आता दीपा मुधोळ मुंडे यांची बीड जिल्हाधिकारी पदावरुन बदली करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने दीपा-मुधोळ मुंडे यांची बदली करण्यात आली आहे.

बीडचे नवे जिल्हाधिकारी – दीपा-मुधोळ मुंडे यांची बदली करण्यात आल्यानंतर बीडच्या जिल्हाधिकारीपदी अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश पाठक हे सध्या बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.