Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

माजी भारतीय क्रिकेटपटूची आत्महत्या, सचिनच्या कर्णधारपदाखाली केले होते पदार्पण, अवघ्या 2 महिन्यातच संपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द


टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन याचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेव्हिड जॉन्सनने आत्महत्या केली आहे, त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली, त्यानंतर त्याला आपला जीव गमवावा लागला. डेव्हिड जॉन्सन डिप्रेशनने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. डेव्हिड जॉन्सनचा जन्म 1971 मध्ये झाला होता, तो 52 वर्षांचा होता, तो बेंगळुरूमध्ये राहत होता. जेथे त्याची क्रिकेट अकादमीही होती.

डेव्हिड जॉन्सनने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. त्या सामन्यात तो फक्त एक विकेट घेऊ शकला आणि त्याचा पहिला बळी मायकेल स्लेटर ठरला. यानंतर, त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर डर्बन कसोटीत संधी मिळाली, जिथे त्याने दोन विकेट्स घेतल्या.

डेव्हिड जॉन्सनला केवळ दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने 10 ऑक्टोबर 1996 रोजी पदार्पण केले आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यानंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आणि तो परत आलाच नाही. डेव्हिड जॉन्सन कर्नाटककडून रणजी ट्रॉफीही खेळला आहे. त्याला 39 सामन्यात 125 विकेट्स घेण्यात यश आले. याशिवाय त्याने 33 लिस्ट ए सामन्यात 41 विकेट घेतल्या. जॉन्सनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही शतक झळकावले आणि नाबाद 101 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.

डेव्हिड जॉन्सन बेंगळुरूमध्येच अकादमी चालवत असे. ज्यामध्ये तो ज्युनियर लेव्हलच्या मुलांना क्रिकेट शिकवत असे. मुलींना क्रिकेटमध्ये प्रोत्साहन देण्यावर त्याचे खूप लक्ष होते. त्याची अकादमी 2020 मध्ये सुरू झाली. त्याचे अपडेट्स तो अनेकदा फेसबुकवर पोस्ट करत असे. पण हा खेळाडू कधी नैराश्यात पडला, याचे भान कोणालाच नव्हते. आता या खेळाडूला आपला जीव गमवावा लागला आहे.