मुलगी जन्मली म्हणून छळ? माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यात उघड बीडच्या महिलेचा पुण्यात छळ
बीड : राज्यभरात विवाहित महिलांवरील छळाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चर्चा अजूनही थांबलेली नाही, आणि अशा पाश्वभूमीवर बीडच्या एका तरुणीच्या छळाची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त मुलगी झाली म्हणून तिला तिच्या चिमुकल्या मुलीसह सासरच्यांनी घराबाहेर काढल्याचं समोर आलं आहे.
ही घटना केवळ एकट्या सुनीता (बदलेलं नाव) ची नसून, अशा अनेक महिलांची ही कथा आहे, ज्या आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या मुलीसाठी लढा देत आहेत.
चारित्र्यावर संशय घेऊन सुरू झाला छळ
सुनीताचं लग्न 1 जून 2021 रोजी मोठ्या मानपानानं झालं. सर्व संसारोपयोगी साहित्य आणि गरजेच्या गोष्टी तिच्या माहेरच्यांनी दिल्या. सुरुवातीची सहा महिने सगळं काही सुरळीत चाललं. मात्र त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली.
सुरुवातीला तिने हा त्रास गप्प बसून सहन केला. पण जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या, तेव्हा 4 फेब्रुवारी 2022 रोजी तिनं आपला दुःखद अनुभव आई-वडील व भावाला सांगितला. सुनीताच्या कुटुंबाने तातडीने पुण्यात धाव घेतली आणि तिला बीडला परत आणलं.
संपवण्यासाठी बैठक, पण त्रास सुरूच
घटनेनंतर काही दिवसांनी सासरच्यांनी पुन्हा तिच्या माहेरच्यांना बोलावून घेतलं. एकत्र बसून चर्चा झाली, वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला. नातं वाचवण्यासाठी सुनीता पुन्हा सासरी गेली. ही पुनरागमनाची तारीख होती 13 मार्च 2023.
पुन्हा काही महिने ठिक गेल्याचे भासले. दरम्यान, सुनीता गर्भवती राहिली. पण तिच्या यातना मात्र थांबल्या नाहीत. शरीराने थकली तरी मनाने ती तग धरत होती – एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून.
मुलगी झाली म्हणून शिक्षा
25 जानेवारी 2024 रोजी तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण या चिमुकल्या जीवाच्या आगमनाने आनंद साजरा करण्याऐवजी, तिच्या सासरच्यांनी तिला उलट आणखी जास्त त्रास द्यायला सुरुवात केली. “तुला मुलगी कशी झाली? आम्हाला मुलगा हवा होता,” हे बोल ऐकून तिच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
तिला उपाशी ठेवणं, मानसिक त्रास देणं, तिच्यावर जबाबदाऱ्यांचा बोजा टाकणं सुरूच राहिलं. “या मुलीचा खर्च कोण करणार?”, असा अपमानजनक प्रश्न तिला ऐकावा लागला.
चिमुकल्या बाळाचाही छळ, अखेर पोलिसांत तक्रार
ज्यांनी तिला आधार द्यायला हवा होता, त्यांनीच तिला आणि तिच्या नवजात मुलीला घराबाहेर काढलं. ही घटना घडली 23 मे 2025 रोजी. त्यानंतर ती थेट माहेरी आली. काही दिवसांनी तिनं हिम्मत करून बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात पतीसह एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या लोकांनी केवळ सुनीताचाच नाही, तर तिच्या निष्पाप मुलीचाही छळ केल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे.