बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान केज तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात वयोवृद्ध महिलेचा कान तोडून सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. यात वृद्ध महिलेचा कान फाटून गंभीर इजा झाली आहे. वयोवृद्ध दाम्पत्याच्या शेतातील शेडमध्ये घुसून चौघा चोरट्यांनी तब्बल ७३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला आहे.
बीडच्या केज तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात सदरची घटना घडली आहे. याप्रकरणी समाबाई तुकाराम लाड (वय ८०) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार मागील दोन दिवसांपासून पतीसोबत लाडेवडगाव शिवारातील अडीच एकर शेतात पत्र्याच्या शेडमध्ये त्या राहत होत्या. दरम्यान १७ जूनच्या रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास चार ते पाच जण आले होते.
चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, नाकातील ३ ग्रॅमची नथ आणि कानातील ४ ग्रॅमची फुले, एक साधा मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. दरम्यान एक कानातील फूल निघत नसल्याने जबरदस्ती तोडले. यात समाबाई यांचा कान फाटून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.