[ad_1]
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत प्रभावीपणे भूमिका मांडल्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसीम मुनीर यांच्या भेटीवर टोमणा मारणारे वक्तव्य केलेले आहे.
ते म्हणाले की, ओसामा बिन लादेनला विसरलात का? ९/११ च्या भीषण हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक असलेल्या ओसामा बिन लादेनला पाकिस्तान सैन्य छावणीच्या जवळ लपवले गेले होते, हे लक्षात ठेवावे, असा थरूर यांनी इशारा दिला.
हे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानच्या लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यात झालेल्या भेटीनंतर करण्यात आले, त्यामुळे त्याला वेगळे महत्त्व आहे. थरूर म्हणाले, अमेरिकेतील काही सिनेटर्स आणि काँग्रेस सदस्यांनी पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळाशी भेटीवेळी यावर चर्चा केली. पण अमेरिकन जनतेला ओसामाचा विषय इतक्या लवकर विसरता येणार नाही.
आसिम मुनीर यांना योग्य इशारा दिला गेला असेल, अशी आशा
थरूर यांनी ट्रम्प यांना असेही सुचवले की, त्यांनी मुनीर यांना “भारताच्या सीमांवर दहशतवाद पसरवण्याचे, दहशतवाद्यांना प्रशिक्षण, शस्त्रे आणि निधी पुरवण्याचे” परिणाम समजावून सांगितले पाहिजे. मी आशा करतो की, जेव्हा या लष्करप्रमुखाला दारू आणि जेवण दिलं जात होतं, तेव्हा हे महत्त्वाचे संदेशही दिले गेले असतील. कारण हे अमेरिका आणि भारत दोघांसाठीही हितकारक आहे,” असे ते म्हणाले.
काश्मीरविषयी मुनीर यांचे वादग्रस्त वक्तव्य
आसिम मुनीर यांनी काश्मीरबाबत अतिशय भडकाऊ आणि अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यांनी काश्मीरला पाकिस्तानची जीवनवाहिनी म्हटले होते आणि पाकिस्तानी संस्कृती भारतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे, असेही वक्तव्य केले होते.पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काहीच दिवस आधी हे वक्तव्य केल्यामुळे त्यावर भारतात मोठ्या प्रमाणावर टीका झाली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका डच ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या हल्ल्यात २६ लोकांना केवळ त्यांच्या धर्मावरून ठार मारले गेले आणि हे सर्व मुनीर यांच्या कट्टर धार्मिक विचारसरणीमुळे घडले, असे ते म्हणाले.
मोदी-ट्रम्प संवाद आणि ऑपरेशन सिंदूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जी-7 परिषदेदरम्यान फोनवर चर्चा झाली होती. त्यानंतर लगेचच मुनीर यांची व्हाइट हाऊस भेट निश्चित केली गेली, त्यामुळे भारतात त्याच्या वेळेबाबतही प्रश्न उपस्थित झाले. फोन द्वारे संवाद साधताना मोदींनी स्पष्ट सांगितले की,काश्मीरप्रश्नी भारत तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी कधीच स्वीकारणार नाही. पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या काबीज केलेला काश्मीर रिकामा करा, ही भारताची मागणी कायम राहील,” असे भारताने पुन्हा एकदा अमेरिकेला ठामपणे सांगितले.
[ad_2]